Saturday, October 21, 2006

दीपावलीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

वैश्विक सूक्ष्मतरंगलहरी व नोबेल २००६

हबलने जेव्हा दूरच्या आकाशगंगांची निरिक्षणे केली तेव्हा त्याला असे लक्षात आले की सर्व आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत. एवढेच नव्हे तर आकाशगंगा जेवढी दूर तितकाच तिचा आपल्यापासून लांब जाण्याचा वेग जास्त. आपल्यापासून दूर जाण्याचा वेग हा त्या आकाशगंगेच्या अंतराच्या समप्रमाणात असतो.

आपल्या आकाशगंगेचे स्थान काही विशेष असण्याचे कारण नसल्याने ही गोष्ट सर्व आकाशगंगांमधून दिसली गेली पाहिजे. म्हणजे सर्व आकाशगंगा एकमेकांपासून लांब जात आहेत. ह्याची कल्पना करण्यासाठी फ़ुग्यांवरील ठिपक्यांचे उदाहरण योग्य ठरते. जसा फ़ुगा फ़ुगवला जातो तसा प्रत्येक ठिपका इतर ठिपक्यांपासून दूर जातो. ठिपक्यांचा आकार देखिल वाढतो, मात्र ही गोष्ट आकाशगंगांना लागू होत नाही.

जर आपण वेळामध्ये मागे गेलो तर विश्व लहान होते असे लक्षात येईल. जेवढे विश्व लहान तेवढी त्याची घनता जास्त व तापमान ही जास्त. जेवढे तापमान जास्त तेवढे अवकाशातील प्रकाशकिरणांची ऊर्जा देखिल जास्त. खूप पूर्वी हे तापमान इतके प्रचंड होते की तेव्हा प्रकाशकिरण इलेक्ट्रॉनवर आदळून त्यांना ऊर्जा द्यायचे. ईलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या जवळ येण्याला यामुळे खीळ बसायची.

पण जसे जसे विश्व प्रसरण पावत गेले तसे तसे तापमानदेखिल कमी होत गेले. प्रकाशकिरणांची ऊर्जा कमी होऊ लागली. आता प्रकाशकिरण ईलेक्ट्रॉनला ऊर्जा पुरवू शकत नव्हते. त्यामुळे ईलेक्ट्रॉन प्रोटॉन एकत्र आले व हायड्रोजनची निर्मिती झाली. प्रकाशकिरण आता कोणावरही न आदळता विश्वामध्ये मुक्तसंचार करू लागले व ते आजतागायत आपुला संचार चालू ठेवत आहेत.

जॉर्ज गॅमो ह्या शास्त्रज्ञाने हे भाकित केले की हे प्रकाशकिरण आजदेखिल आपल्याला दिसले पाहिजेत. पेन्झियास आणि विल्सन ह्या अभियांत्रिकांना हे प्रकाशकिरण सर्वात पहिल्यांदा अनावधानाने सापडले. त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. जेव्हा आपण आपल्या दूरसंचारपटावर कोणतीही वाहिनी नसताना जे पांढरे व काळे ठिपके पाहतो तेव्हा आपण ह्या प्रकाशकिरणांपैकी काही किरणे पाहत असतो.

ह्या प्रकाशकिरणांची ऊर्जा विश्वप्रसरणाने सतत घटत आहे. थोडक्यात त्यांची तरंगलांबी वाढत आहे. हे प्रकाशकिरण आपल्याला विश्वाच्या प्राथमिक रूपाचे दर्शन घडवतात. ह्यांचा अभ्यास करण्यासाठी कोबे नावाचे यान पाठविण्यात आले. त्याच्या निरिक्षणांनी हे सिद्ध झाले की ह्या सूक्ष्मलहरींचे तापमान आकाशातील सर्व दिशांमध्ये सारखे आहे. थोडक्यात हे विश्व फ़ार लहान असताना एकजीव होते. ह्या सूक्ष्मलहरींचे तापमान २.७३ केल्विन म्हणजे -२७०.२७° सेल्सियस एवढे आहे.


जेव्हा ह्या लहरींचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळले की हे तापमान पूर्ण आकाशात जवळजवळ सारखे आहे. आणि ह्या तापमानापासूनचा फ़रक हा केवळ एकात दहा हजार एवढा लहान प्रमाणात आकाशात बदलतो. वर दाखविलेले चित्र हे विश्वाचे कोबे ने घेतलेले छायाचित्र आहे. ह्यातील लाल ठिपके म्हणजे थोड्या जास्त तापमान असलेल्या जागा व निळा रंग म्हणजे थोड्या कमी तापमान असलेल्या जागा.

कोबेचे जनक जॉन मॅथर व जॉर्ज स्मूट ह्यांना या संशोधनासाठी ह्या वर्षीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. खगोलशास्त्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नोबेल पारितोषिके मिळत असल्याने अभ्यासासाठी हे एक आकर्षक केंद्र ठरत आहे.

Tuesday, October 10, 2006

२००६ भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक

२००६ मधिल भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक काही दिवसांपूर्वी जाहिर झाले. वेळे अभावी ही बातमी कृत्तिका द्वारे देणे राहून गेले. हे पारितोषिक विश्वरचनाशास्त्रातील एका महत्त्वपूर्ण कामगिरी करिता देण्यात आले. ह्या संशोधनाविषयी पुढिल रविवारच्या लेखामध्ये...