Wednesday, April 09, 2008

गेल्या महिन्यात नासाच्या कॅसिनी ह्या अंतराळयानने शनिच्या एन्सेलडस ह्या उपग्रहाला धावती भेट दिली. मी ह्या भेटीला धावती म्हणते आहे कारण कॅसिनीने एन्सेलडासच्या जवळून जाता जाता त्याची काही छायाचित्रे घेतली. अश्या भेटीला खगोलशास्त्राच्या भाषेत फ्लाय बाय असे म्हटले जाते. जेव्हा एखादे अंतराळयान आपल्या मुख्य उद्दिष्टाकडे जाताना एखाद्या ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या जवळून जाते तेव्हा शस्त्रज्ञ त्याला फ्लाय बाय असे संबोधतात. तर कॅसिनीने पण असाच एक फ्लाय बाय केला.

एन्सेलडसची जी छायाचित्रे कॅसिनीने पाठवली ती अत्यंत रोमांचाक आहेत. हा शनीचा उपग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी घटक आहे. ह्याच्या पृष्ठभागावरील बर्फावारून सूर्यप्रकाश परवर्तीत होतो आणि त्यामुळे हा इतका तेजस्वी दिसतो असा अंदाज आहे. परंतु हा त्याच्या आकाराने तितका मोठा नाही. केवळ आरिझोनच्या आकराएवढ्या ह्या उपग्रहावर खूप घडामोडी चालू आहेत.टिटॅन ह्या शनीच्या उपग्राहाबद्दल अगोदरच खूप कुतूहल आहे. आता एन्सेलदास पण त्याच्या जोडीला आला आहे. हा छोटासा उपग्रह इतके दिवस एखाद्या धूमकेतू प्रमाणे मानण्यात येत होता. आणि ह्याचा पृष्ठभागावर बर्फ असेल असा अंदाज केला जात होता.

छायाचित्रांमधे ह्याच्या पृष्टभागावर गरम झरे आढळून आले आहेत. ह्या उपग्रहावर सापडलेली रासायाने देखील आश्चर्यजनाक आहेत. ह्याच्या अंतर्भागातून बाहेर पडणारी रासायाने धुमकेतूंवर सापडतात. ही सूर्यमालेच्या अत्यंत सुरुवातीला अस्तित्वात होती असे मानण्यात येते. काळाच्या ओघात ही रासायाने इतर रासायनामधे रुपांतरित झाली असा अंदाज आहे. एन्सेलडासवर दिसलेली ही रासायाने शनी आणि त्याचे उपग्रह कसे निर्माण झाले ह्या बद्दल खूप प्रश्न निर्माण करतात. कॅसिनीने पाठवलेली नवीन माहिती ह्या गरम झर्याच्या उगमाबद्दल माहिती देऊ शकेल. अजुन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे एन्सेलदासच्या तापमनावरून असे दिसते की द्रावरूप पाणी ह्याच्या पृष्ठभगापेक्षा जास्त खोल नाही आहे. एन्सेलडस हा असा एकटाच उपग्रह नाही आहे.

आपल्याला आपल्याच सूर्यमालेतील खूप गोष्टींबद्दल माहिती नाही आहे. शनीची कॅसिनी डिविजन कशी निर्माण झाली हे आपल्याला अजुन पूर्णपणे समजलेले नाही. टिटॅन ह्या उपग्रहावर पुढे कधी जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल का ह्याबद्दल अजूनही तर्क वितर्क चालू आहेत. एखाद्या उपग्रहावर इतक्या घडामोडी कशा चालू असतात आणि आपल्या चंद्रावर का नाहीत अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे एक मनोरंजक कोडे आहे. अश्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या सूर्यमालेच्या उगमाबद्दल उपयोगी माहिती देतील. इतकेच नव्हे तर आपल्या सूर्यमालेचे खोलवर ज्ञान इतर ग्रहमालेंबद्दल अधिक माहिती देतील. सध्यातरी कॅसिनीने पाठवलेली नवीन छायाचित्रे शास्त्रज्ञांना बराच वेळ गुंतवून ठेवतील ह्यात शंका नाही.

-अदृश्य मने