Wednesday, April 25, 2007

अवकाशातिल भिंग

अवकाशातिल भिंग म्हटले की लगेच हबल दुर्बिणीची आठवण येते. भिंगाचा उपयोग दूर वरिल वस्तू पाहण्याकरिता होतो कारण त्या वस्तू आपल्याला मोठ्या असल्याचा भास होतो. पण मानवनिर्मित दुर्बिणींपेक्षाही मोठ्या दुर्बिणी अवकाशात सापडतात. आज ह्या मोठ्या भिंगांबद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.


गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव विश्वातिल प्रत्येक वस्तूमानावर होतो. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार असाच प्रभाव प्रकाशकिरणांवर देखिल होतो. खरं तर सापेक्षतावादासाठी ही एक महत्त्वाची कसोटी होती. आपल्या सगळ्यात जवळची प्रचंड वस्तूमान असलेली गोष्ट म्हणजे सूर्य. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ असलेल्या ताऱ्यांच्यामधिल अंतर हे वाढलेले दिसले पाहिजे असे भाकित आईन्स्टाईनने केले होते. इ. स. १९१९ साली सर अर्थर एड्डिंग्टन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या गोष्टीची खात्री केली व सापेक्षतावादाच्या सिद्धांताला एक मोठा आधार मिळाला.


ऍबेल १६८९ ह्या आकाशगंगासमूहाचे हबल ने टिपलेले हे छायाचित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा गुरूत्त्वकर्षणाचा हा खेळ आपल्या नजरेला भारावून टाकतो. हा आकाशगंगा समूह आपल्या पासून जवळजवळ २०००००० प्रकाशवर्षे दूर आहे. हा समूह विश्वातिल प्रचंड मोठ्या समूहांपैकी एक आहे. आकाशगंगांच्या ताऱ्यांमध्ये असणारे प्रकाश देणारे वस्तूमान व आपल्या न दिसणारे असे कृष्ण वस्तूमान यांच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे हा समूह एका भिंगाप्रमाणे कार्य करतो. हे छायाचित्र पाहिले असता आपल्याला काही गोलाकार रेषा आढळून येतात. समूहाच्या मागे दूर वर असलेल्या काही आकाशगंगांचा प्रकाश जेव्हा ह्या समूहाच्या गुरुत्त्वाकर्षणाच्या पट्ट्यात सापडतो तेव्हा त्या आकाशगंगांचा आकार अशा प्रकारचा होतो. जत्रेमध्ये जादूचे आरसे ज्याप्रमाणे कार्य करतात बरोबर तशाच प्रकारे गुरुत्त्वाकर्षणाची ही भिंग कार्य करते. जर गुरुत्त्वाकर्षणाची ही भिंग व मागिल स्त्रोत एकाच रेषेत अाले तर मागचा स्त्रोत एका रिंगणाप्रमाणे दिसतो.हबलने टिपलेल्या अवकाशातिल अशा रिंगणांची काही छायाचित्रे आपण येथे पाहू शकता.


गुरुत्त्वाकर्षण व प्रकाश यांच्या या अनोख्या खेळाचा उपयोग करून ताऱ्यांभोवतालच्या ग्रहांचा शोध घेता येतो. विश्वरचनाशास्त्रबद्दल देखिल भरपूर माहिती मिळवता येते. ह्या बाबतची माहिती पुढिल काही लेखांमध्ये...