Saturday, November 29, 2008

मुंबई

खरे पाहता कृत्तिका ही जागा मी आज ज्या विषयावर बोलणार आहे त्यासाठी नाही आहे. पण माझ्या मनातील राग आणि भावना व्यक्त करण्यासाठी आज मी थोडी स्वार्थी होणार आहे. विषय जो आज प्रत्येक माणसाच्या मनात जागा आहे, विषय आज ज्यावर कित्येक ब्लॉग आपली मते मांडत आहेत. मुंबई आणि तिथे गेल्या चार दिवसात जे काही घडले. मला त्या गोष्टींचा उहापोह इथे करायचा नाही आहे, नाही मी सुरक्षा व्यवस्था ह्यासारख्या विषयावर बोलणार आहे. साहजिकच मी का लिहितेय क्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
मी एक मुंबईकर आहे. परंतु माझ्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबई भेटीपर्यंत मी खरी मुंबईकर नव्हते असेच म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून मी झीरो पॉइण्ट बॉम्बे हे पुस्तक वाचतेय.हे पुस्तक एन्ग्रजि भाषेत आहे. २१ लघुनिबंधांच्या ह्या लहानश्या संग्रहात मुंबईविषयी फार रमणीय माहिती आहे. एकीकडे हे पुस्तक वाचताना घडलेली मुंबई भेट मला मुंबई वेगळ्याच चश्‍म्यातून दाखवून गेली. एशियाटीक सोसायटीचे भव्य खांब पाहाताना मला माहिती होते की ते ब्रिटन मधून तयार करून आणले आहेत. कोलब्यामधील प्रत्येक वास्तू माझ्यासमोर युरोपियन आणि भारतीय वास्तुकलेचा एक नमूना समोर ठेवत होती. लेओपॉल्ड केफे मला शांतारामची आठवण देऊन गेला. आणि माझ्या मनात एकाच विषार येत होता, ह्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत. ही जागा अजूनही सुंदर बनवली गेली पाहिजे. कदाचित पहिल्यांदाच मला प्रकर्षाने जाणवत होते की ज्या ठिकाणी माझा उद्गम झाला आहे ती जागा स्वातंत्र्य युद्ध सोडून अजुन कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आणि मुंबईत राहणार्‍या काहीच लोकणा ह्याबद्दल माहिती आहे.
लेओपॉल्ड केफे, सी. एस. टी. स्टेशन, किंवा ताज ह्यांसारख्या ठिकणांवर झालेले हल्ले हे केवळ मुंबईवरच नव्हते तर ते त्या प्रत्येक मुंबईकरवर होते ज्याने मुंबईवर मनापासून प्रेम केला आहे. ज्याने पाव भाजी आणि वडा पाव सोबत आयुष्या घालवला आहे, ज्याने लेओपॉल्ड मधे बसून बियर प्यायली आहे आणि ज्याने एसियाटीक सोसायटीच्या आवारात रात्री घालवल्या आहेत, ज्याने मुंबईचा इतिहास आणि मुंबईचे भविष्य एकत्र पहिले आहे, त्या प्रत्येकाला ह्या घटनेने हादरवले आहे. प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेने काय केले पाहिजे यापेक्षा आज अधिक महत्वाचा प्रश्न आहे की आपण काय केले पाहिजे. आणि कमीत कमी आपण ह्या शहराला जपले पाहिजे. प्रेम करणे म्हणजे आय लव मुंबई असे म्हणणे किवा मी मुंबईचा विचार करतो असा असतो की हे माझे शहर आहे आणि ह्याच्या सुरक्षेसाठी मी सर्व प्रयत्न करेन हा दृष्टिकोन असतो?
माझ्या मते अगदी सर्वसामान्यांच्या मनात हा विचार जागा होत नाही तोपर्यंत आपला हलगर्जीपणा थांबणार नाही आणि तोपर्यंत आज ज्यानी आपले जीव घालवले त्यांची आहुती सार्थ होणार नाही.

Monday, August 18, 2008

डार्क मैटर

तुम्ही आणि मी ज्या अणू-रेणू पासून बनले आहोत ते ह्या विश्वाचा केवळ पाच टक्के भाग आहे असा जर तुम्हाला सांगितले तर ते खरा वाटेल? पण हे खरे आहे. मनुष्य आणि ही संपूर्ण जीवसृष्टी ह्या विश्वाचा अत्यंत छोटा भाग आहेत. ह्या विश्वाचा जवळपास वीस ते पंचवीस टक्के भाग अदृश्य घटकाने व्यापला आहे ज्याला आपण डार्क मॅटर म्हणतो आणि उर्वरित सत्तर टक्के अदृश्य उर्जा आहे जीला खगोलशतराज्ञ डार्क एनर्जी ह्या नावाने ओळखतात. आपले विश्व असे आहे ह्यावर आज खगोलशास्त्रज्ञांचे एकमत आहे. पण हे ९५ टक्के विश्व जे आपल्याला दिसत नाही ते कसले बनले आहे आणि काय आहे हा प्रश्ना साहजिकच आपल्या मनात येतो. डार्क एनर्जी हे आज खगोलशास्त्रातील एक आव्हान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्याला आजवर डार्क एनर्जी बद्दल फार थोडे माहिती आहे. डार्क मॅटर ह्या विषयावर त्या मानाने आपण जरा भाग्यवान आहोत. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे डार्क मॅटर हे गुरुत्वकर्शणाच्या माध्यमाने इतर घटकांशी माध्यमातून आपले अस्तित्व दाखवून देते. इतक्या मोठ्या प्रमणावर उपस्थित असल्याने ते इतर घटकांना आकर्षित करते. डार्क मॅटर ह्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रकाशाच्या काणांबरोबर किंवा प्रकाशाशी ह्याची प्रकशासोबत प्रतिक्रिया होत नाही. ह्यामुळे आपल्याला ते दिसताही नाही. परंतु विश्वाच्या मोठ्या प्रमाणावरील रचनेच्या अभ्यासातून हे निष्पन्न झाले आहे की हे उर्जा नसून काणांचे बनले आहे, म्हणजेच हे वस्तुमान ( मॅटर) आहे.
येथून पुढील काही लेखांमधे मी ह्या अदृश्य घटकावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करेन.

Wednesday, April 09, 2008

गेल्या महिन्यात नासाच्या कॅसिनी ह्या अंतराळयानने शनिच्या एन्सेलडस ह्या उपग्रहाला धावती भेट दिली. मी ह्या भेटीला धावती म्हणते आहे कारण कॅसिनीने एन्सेलडासच्या जवळून जाता जाता त्याची काही छायाचित्रे घेतली. अश्या भेटीला खगोलशास्त्राच्या भाषेत फ्लाय बाय असे म्हटले जाते. जेव्हा एखादे अंतराळयान आपल्या मुख्य उद्दिष्टाकडे जाताना एखाद्या ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या जवळून जाते तेव्हा शस्त्रज्ञ त्याला फ्लाय बाय असे संबोधतात. तर कॅसिनीने पण असाच एक फ्लाय बाय केला.

एन्सेलडसची जी छायाचित्रे कॅसिनीने पाठवली ती अत्यंत रोमांचाक आहेत. हा शनीचा उपग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी घटक आहे. ह्याच्या पृष्ठभागावरील बर्फावारून सूर्यप्रकाश परवर्तीत होतो आणि त्यामुळे हा इतका तेजस्वी दिसतो असा अंदाज आहे. परंतु हा त्याच्या आकाराने तितका मोठा नाही. केवळ आरिझोनच्या आकराएवढ्या ह्या उपग्रहावर खूप घडामोडी चालू आहेत.टिटॅन ह्या शनीच्या उपग्राहाबद्दल अगोदरच खूप कुतूहल आहे. आता एन्सेलदास पण त्याच्या जोडीला आला आहे. हा छोटासा उपग्रह इतके दिवस एखाद्या धूमकेतू प्रमाणे मानण्यात येत होता. आणि ह्याचा पृष्ठभागावर बर्फ असेल असा अंदाज केला जात होता.

छायाचित्रांमधे ह्याच्या पृष्टभागावर गरम झरे आढळून आले आहेत. ह्या उपग्रहावर सापडलेली रासायाने देखील आश्चर्यजनाक आहेत. ह्याच्या अंतर्भागातून बाहेर पडणारी रासायाने धुमकेतूंवर सापडतात. ही सूर्यमालेच्या अत्यंत सुरुवातीला अस्तित्वात होती असे मानण्यात येते. काळाच्या ओघात ही रासायाने इतर रासायनामधे रुपांतरित झाली असा अंदाज आहे. एन्सेलडासवर दिसलेली ही रासायाने शनी आणि त्याचे उपग्रह कसे निर्माण झाले ह्या बद्दल खूप प्रश्न निर्माण करतात. कॅसिनीने पाठवलेली नवीन माहिती ह्या गरम झर्याच्या उगमाबद्दल माहिती देऊ शकेल. अजुन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे एन्सेलदासच्या तापमनावरून असे दिसते की द्रावरूप पाणी ह्याच्या पृष्ठभगापेक्षा जास्त खोल नाही आहे. एन्सेलडस हा असा एकटाच उपग्रह नाही आहे.

आपल्याला आपल्याच सूर्यमालेतील खूप गोष्टींबद्दल माहिती नाही आहे. शनीची कॅसिनी डिविजन कशी निर्माण झाली हे आपल्याला अजुन पूर्णपणे समजलेले नाही. टिटॅन ह्या उपग्रहावर पुढे कधी जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल का ह्याबद्दल अजूनही तर्क वितर्क चालू आहेत. एखाद्या उपग्रहावर इतक्या घडामोडी कशा चालू असतात आणि आपल्या चंद्रावर का नाहीत अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे एक मनोरंजक कोडे आहे. अश्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या सूर्यमालेच्या उगमाबद्दल उपयोगी माहिती देतील. इतकेच नव्हे तर आपल्या सूर्यमालेचे खोलवर ज्ञान इतर ग्रहमालेंबद्दल अधिक माहिती देतील. सध्यातरी कॅसिनीने पाठवलेली नवीन छायाचित्रे शास्त्रज्ञांना बराच वेळ गुंतवून ठेवतील ह्यात शंका नाही.

-अदृश्य मने

Sunday, March 30, 2008

गॅमा रे स्फोट

काही दिवसांपूर्वी एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी होती भूतप किवा बूट्स ह्या तारका नक्षत्रा बद्दल. नासाच्या स्विफ्ट ह्या अवकाशयानाने ह्या तारकासमुहात सर्वात तेजस्वी गॅमा रे स्फोट झाल्याचे वृत्त दिले. ह्या घटनेचे नीमित्त साधून मी येथे गॅमा रे स्फोटांसंबंधी काही माहिती देत आहे. गॅमा रे स्फोट नक्की काय असतात ह्याबद्दल माहिती करून घेण्यापूर्वी गॅमा रे म्हणजे काय हे जाणून घेणे उपयोगी ठरेल.












प्रकाश हा लहरींचा बनलेला आहे. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रकाशाला वेगवेगळ्या विभागांमधे वाटले आहे. चित्रामधे आपण हे सगळे विभाग बघू शकतो. जसेजसे आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसे प्रकाशाची उर्जा वाढत जाईल.
ह्या चित्रावरून आपण हे पण समजू शकतो की प्रकाशाची वारंवारता जशी वाढत जाते तशी त्याची उर्जा वाढत जाते.

गॅमा रेंची वारंवारता सर्वात जास्त आहे. आणि म्हणूनच त्यांची उर्जा सर्वात जास्त आहे. गॅमा रेंची वारंवारता ही साधारण १०^१८ हर्ट्झ इतकी असते. गॅमा रे स्फोट हे खगोल
शास्त्रामधील एक कोडे आहे. हे स्फोट कित्येक वेळा काही सेकंद ते काही दिवस ह्या अवधी पर्यंत बघता येतात. ह्या स्फोटांची उर्जा १०^५४ जूल्स इतकी जास्त असु शकते. जर आपण सूर्याला उर्जेमधे बदलले तर इतकी उर्जा मिळू शकते. ह्या स्फोटांतून इतकी प्रचंड उर्जा कशी निर्माण होते ह्याबद्दल काही तर्क लावण्यात आले आहेत. जेव्हा एखाद्या ताऱ्याचे कृष्णविवरात रुपांतर होते किंवा दोन न्युट्रॉन तारे एकमेकांवर आपटतात तेव्हा ह्या शक्तीशाली गॅमा रे स्फोटांचा जन्म होतो असे मानण्यात येते. अशा प्रक्रिया अवकाशात दुर्मिळ असतात आणि आपल्याला त्यांच्या मने ताऱ्यांच्या मृत्युबद्दल किंवा त्यांच्या आयुष्यातील विविध घडामोडींबद्दल महत्वाची माहिती मिळवता येते.

भूतप ह्या तारकासमुहात पहिला गेलेला हा गॅमा रे स्फोट म्हणूनच बातमीचा विषय ठरला आहे. हा एकमेव असा सर्वात शक्तिशाली गॅमा रे स्फोट आहे जो मानवी डोळ्यांनी बघितला गेला आहे. शस्त्रज्ञ मानतात की ह्या स्फोटातून निर्माण झालेला प्रकाश ७ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला होता।
आज विश्वाचे वय १४ अब्ज वर्षे आहे. म्हणजेच ह्या प्रकाशाने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विश्वाच्या वयाच्या अर्ध्या कालावधी इतका प्रवास केला आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या मते स्फ़ोट त्याच अंतरावर होणार्‍या साधारण स्फोटापेक्षा १० कोटी जास्त प्रखर होता. ह्या घटणेचा पुढे सखोल अभ्यास चालू आहे. स्विफ्ट ह्या अंतराळयानाने त्या दिवशी चार गॅमा रे स्फोट पहिले. एका दिवशी झालेले चार दुर्मिळ असे हे स्फोट खगोल शास्त्राच्या जगात एक चर्चेचा विषय बनला आहे।

अदृश्य मने

Wednesday, April 25, 2007

अवकाशातिल भिंग

अवकाशातिल भिंग म्हटले की लगेच हबल दुर्बिणीची आठवण येते. भिंगाचा उपयोग दूर वरिल वस्तू पाहण्याकरिता होतो कारण त्या वस्तू आपल्याला मोठ्या असल्याचा भास होतो. पण मानवनिर्मित दुर्बिणींपेक्षाही मोठ्या दुर्बिणी अवकाशात सापडतात. आज ह्या मोठ्या भिंगांबद्दल थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.


गुरुत्त्वाकर्षणाचा प्रभाव विश्वातिल प्रत्येक वस्तूमानावर होतो. आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार असाच प्रभाव प्रकाशकिरणांवर देखिल होतो. खरं तर सापेक्षतावादासाठी ही एक महत्त्वाची कसोटी होती. आपल्या सगळ्यात जवळची प्रचंड वस्तूमान असलेली गोष्ट म्हणजे सूर्य. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या जवळ असलेल्या ताऱ्यांच्यामधिल अंतर हे वाढलेले दिसले पाहिजे असे भाकित आईन्स्टाईनने केले होते. इ. स. १९१९ साली सर अर्थर एड्डिंग्टन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या गोष्टीची खात्री केली व सापेक्षतावादाच्या सिद्धांताला एक मोठा आधार मिळाला.


ऍबेल १६८९ ह्या आकाशगंगासमूहाचे हबल ने टिपलेले हे छायाचित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा गुरूत्त्वकर्षणाचा हा खेळ आपल्या नजरेला भारावून टाकतो. हा आकाशगंगा समूह आपल्या पासून जवळजवळ २०००००० प्रकाशवर्षे दूर आहे. हा समूह विश्वातिल प्रचंड मोठ्या समूहांपैकी एक आहे. आकाशगंगांच्या ताऱ्यांमध्ये असणारे प्रकाश देणारे वस्तूमान व आपल्या न दिसणारे असे कृष्ण वस्तूमान यांच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे हा समूह एका भिंगाप्रमाणे कार्य करतो. हे छायाचित्र पाहिले असता आपल्याला काही गोलाकार रेषा आढळून येतात. समूहाच्या मागे दूर वर असलेल्या काही आकाशगंगांचा प्रकाश जेव्हा ह्या समूहाच्या गुरुत्त्वाकर्षणाच्या पट्ट्यात सापडतो तेव्हा त्या आकाशगंगांचा आकार अशा प्रकारचा होतो. जत्रेमध्ये जादूचे आरसे ज्याप्रमाणे कार्य करतात बरोबर तशाच प्रकारे गुरुत्त्वाकर्षणाची ही भिंग कार्य करते. जर गुरुत्त्वाकर्षणाची ही भिंग व मागिल स्त्रोत एकाच रेषेत अाले तर मागचा स्त्रोत एका रिंगणाप्रमाणे दिसतो.हबलने टिपलेल्या अवकाशातिल अशा रिंगणांची काही छायाचित्रे आपण येथे पाहू शकता.


गुरुत्त्वाकर्षण व प्रकाश यांच्या या अनोख्या खेळाचा उपयोग करून ताऱ्यांभोवतालच्या ग्रहांचा शोध घेता येतो. विश्वरचनाशास्त्रबद्दल देखिल भरपूर माहिती मिळवता येते. ह्या बाबतची माहिती पुढिल काही लेखांमध्ये...

Monday, January 01, 2007

नव वर्षाच्या शुभेच्छा...

नव वर्षाच्या शुभेच्छा.

अभ्यासाचा व्याप वाढल्याने लेखन कमी होत असल्याबद्दल क्षमा असावी...

अमृता.

Saturday, October 21, 2006

दीपावलीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

वैश्विक सूक्ष्मतरंगलहरी व नोबेल २००६

हबलने जेव्हा दूरच्या आकाशगंगांची निरिक्षणे केली तेव्हा त्याला असे लक्षात आले की सर्व आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत. एवढेच नव्हे तर आकाशगंगा जेवढी दूर तितकाच तिचा आपल्यापासून लांब जाण्याचा वेग जास्त. आपल्यापासून दूर जाण्याचा वेग हा त्या आकाशगंगेच्या अंतराच्या समप्रमाणात असतो.

आपल्या आकाशगंगेचे स्थान काही विशेष असण्याचे कारण नसल्याने ही गोष्ट सर्व आकाशगंगांमधून दिसली गेली पाहिजे. म्हणजे सर्व आकाशगंगा एकमेकांपासून लांब जात आहेत. ह्याची कल्पना करण्यासाठी फ़ुग्यांवरील ठिपक्यांचे उदाहरण योग्य ठरते. जसा फ़ुगा फ़ुगवला जातो तसा प्रत्येक ठिपका इतर ठिपक्यांपासून दूर जातो. ठिपक्यांचा आकार देखिल वाढतो, मात्र ही गोष्ट आकाशगंगांना लागू होत नाही.

जर आपण वेळामध्ये मागे गेलो तर विश्व लहान होते असे लक्षात येईल. जेवढे विश्व लहान तेवढी त्याची घनता जास्त व तापमान ही जास्त. जेवढे तापमान जास्त तेवढे अवकाशातील प्रकाशकिरणांची ऊर्जा देखिल जास्त. खूप पूर्वी हे तापमान इतके प्रचंड होते की तेव्हा प्रकाशकिरण इलेक्ट्रॉनवर आदळून त्यांना ऊर्जा द्यायचे. ईलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या जवळ येण्याला यामुळे खीळ बसायची.

पण जसे जसे विश्व प्रसरण पावत गेले तसे तसे तापमानदेखिल कमी होत गेले. प्रकाशकिरणांची ऊर्जा कमी होऊ लागली. आता प्रकाशकिरण ईलेक्ट्रॉनला ऊर्जा पुरवू शकत नव्हते. त्यामुळे ईलेक्ट्रॉन प्रोटॉन एकत्र आले व हायड्रोजनची निर्मिती झाली. प्रकाशकिरण आता कोणावरही न आदळता विश्वामध्ये मुक्तसंचार करू लागले व ते आजतागायत आपुला संचार चालू ठेवत आहेत.

जॉर्ज गॅमो ह्या शास्त्रज्ञाने हे भाकित केले की हे प्रकाशकिरण आजदेखिल आपल्याला दिसले पाहिजेत. पेन्झियास आणि विल्सन ह्या अभियांत्रिकांना हे प्रकाशकिरण सर्वात पहिल्यांदा अनावधानाने सापडले. त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. जेव्हा आपण आपल्या दूरसंचारपटावर कोणतीही वाहिनी नसताना जे पांढरे व काळे ठिपके पाहतो तेव्हा आपण ह्या प्रकाशकिरणांपैकी काही किरणे पाहत असतो.

ह्या प्रकाशकिरणांची ऊर्जा विश्वप्रसरणाने सतत घटत आहे. थोडक्यात त्यांची तरंगलांबी वाढत आहे. हे प्रकाशकिरण आपल्याला विश्वाच्या प्राथमिक रूपाचे दर्शन घडवतात. ह्यांचा अभ्यास करण्यासाठी कोबे नावाचे यान पाठविण्यात आले. त्याच्या निरिक्षणांनी हे सिद्ध झाले की ह्या सूक्ष्मलहरींचे तापमान आकाशातील सर्व दिशांमध्ये सारखे आहे. थोडक्यात हे विश्व फ़ार लहान असताना एकजीव होते. ह्या सूक्ष्मलहरींचे तापमान २.७३ केल्विन म्हणजे -२७०.२७° सेल्सियस एवढे आहे.


जेव्हा ह्या लहरींचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळले की हे तापमान पूर्ण आकाशात जवळजवळ सारखे आहे. आणि ह्या तापमानापासूनचा फ़रक हा केवळ एकात दहा हजार एवढा लहान प्रमाणात आकाशात बदलतो. वर दाखविलेले चित्र हे विश्वाचे कोबे ने घेतलेले छायाचित्र आहे. ह्यातील लाल ठिपके म्हणजे थोड्या जास्त तापमान असलेल्या जागा व निळा रंग म्हणजे थोड्या कमी तापमान असलेल्या जागा.

कोबेचे जनक जॉन मॅथर व जॉर्ज स्मूट ह्यांना या संशोधनासाठी ह्या वर्षीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. खगोलशास्त्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नोबेल पारितोषिके मिळत असल्याने अभ्यासासाठी हे एक आकर्षक केंद्र ठरत आहे.