Saturday, November 29, 2008

मुंबई

खरे पाहता कृत्तिका ही जागा मी आज ज्या विषयावर बोलणार आहे त्यासाठी नाही आहे. पण माझ्या मनातील राग आणि भावना व्यक्त करण्यासाठी आज मी थोडी स्वार्थी होणार आहे. विषय जो आज प्रत्येक माणसाच्या मनात जागा आहे, विषय आज ज्यावर कित्येक ब्लॉग आपली मते मांडत आहेत. मुंबई आणि तिथे गेल्या चार दिवसात जे काही घडले. मला त्या गोष्टींचा उहापोह इथे करायचा नाही आहे, नाही मी सुरक्षा व्यवस्था ह्यासारख्या विषयावर बोलणार आहे. साहजिकच मी का लिहितेय क्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.
मी एक मुंबईकर आहे. परंतु माझ्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबई भेटीपर्यंत मी खरी मुंबईकर नव्हते असेच म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून मी झीरो पॉइण्ट बॉम्बे हे पुस्तक वाचतेय.हे पुस्तक एन्ग्रजि भाषेत आहे. २१ लघुनिबंधांच्या ह्या लहानश्या संग्रहात मुंबईविषयी फार रमणीय माहिती आहे. एकीकडे हे पुस्तक वाचताना घडलेली मुंबई भेट मला मुंबई वेगळ्याच चश्‍म्यातून दाखवून गेली. एशियाटीक सोसायटीचे भव्य खांब पाहाताना मला माहिती होते की ते ब्रिटन मधून तयार करून आणले आहेत. कोलब्यामधील प्रत्येक वास्तू माझ्यासमोर युरोपियन आणि भारतीय वास्तुकलेचा एक नमूना समोर ठेवत होती. लेओपॉल्ड केफे मला शांतारामची आठवण देऊन गेला. आणि माझ्या मनात एकाच विषार येत होता, ह्या गोष्टी जपल्या गेल्या पाहिजेत. ही जागा अजूनही सुंदर बनवली गेली पाहिजे. कदाचित पहिल्यांदाच मला प्रकर्षाने जाणवत होते की ज्या ठिकाणी माझा उद्गम झाला आहे ती जागा स्वातंत्र्य युद्ध सोडून अजुन कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आणि मुंबईत राहणार्‍या काहीच लोकणा ह्याबद्दल माहिती आहे.
लेओपॉल्ड केफे, सी. एस. टी. स्टेशन, किंवा ताज ह्यांसारख्या ठिकणांवर झालेले हल्ले हे केवळ मुंबईवरच नव्हते तर ते त्या प्रत्येक मुंबईकरवर होते ज्याने मुंबईवर मनापासून प्रेम केला आहे. ज्याने पाव भाजी आणि वडा पाव सोबत आयुष्या घालवला आहे, ज्याने लेओपॉल्ड मधे बसून बियर प्यायली आहे आणि ज्याने एसियाटीक सोसायटीच्या आवारात रात्री घालवल्या आहेत, ज्याने मुंबईचा इतिहास आणि मुंबईचे भविष्य एकत्र पहिले आहे, त्या प्रत्येकाला ह्या घटनेने हादरवले आहे. प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेने काय केले पाहिजे यापेक्षा आज अधिक महत्वाचा प्रश्न आहे की आपण काय केले पाहिजे. आणि कमीत कमी आपण ह्या शहराला जपले पाहिजे. प्रेम करणे म्हणजे आय लव मुंबई असे म्हणणे किवा मी मुंबईचा विचार करतो असा असतो की हे माझे शहर आहे आणि ह्याच्या सुरक्षेसाठी मी सर्व प्रयत्न करेन हा दृष्टिकोन असतो?
माझ्या मते अगदी सर्वसामान्यांच्या मनात हा विचार जागा होत नाही तोपर्यंत आपला हलगर्जीपणा थांबणार नाही आणि तोपर्यंत आज ज्यानी आपले जीव घालवले त्यांची आहुती सार्थ होणार नाही.