
हबलने टिपलेले आपल्या विश्वाचे हे सर्वात दूरचे चित्र. एक लक्ष सेकंदांसाठी (२८ दिवस) हबलचा रोख एकाच दिशेला ठेऊन हे चित्र घेतले गेले आहे. जेव्हा हबल जास्त वेळ एकाच ठिकाणी पाहते व त्या दिशेने येणारे प्रकाशकण गोळा करते, तेव्हा कमी दिप्ती असलेल्या वस्तू हळूहळू तिने पाठविलेल्या छायाचित्रात दिसू लागतात.
हे चित्र आकाशातिल एका अशा जागेचे आहे जेथून साध्या डोळ्याने कोणतेच तारे दिसत नाही. त्यामुळे या चित्रात दिसणाऱ्या जवळपास सर्व गोष्टी आकाशगंगा आहेत. प्रकाशाचा वेग मर्यादित असल्याने, दूर च्या आकाशगंगांतून प्रकाश आपल्या पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागतो. यामुळे दूर पाहणे म्हणजे भूतकाळात पाहण्यासारखे आहे. साधे उदाहरण द्यायचे तर, सूर्य आपल्यापासून ५०० प्रकाशसेकंद दूर आहे. याचा अर्थ असा होतो की आपण जेव्हा सूर्य बघतो, तेव्हा तो ५०० सेकंदापूर्विचा असतो कारण जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात ते सूर्याकडून ५०० सेकंदापूर्वी निघाले असतात.
त्यामुळे ह्या चित्रातील काही आकाशगंगा ह्या विश्वाच्या बालपणातिल आकाशगंगा आहेत. सर्वात लांब असलेल्या आकाशगंगा लाल दिसतात. जसेजसे आपले विश्व प्रसरण पावते तसे तसे प्रकाशाची तरंगलांबी वाढत जाते. त्यामुळे लांबच्या आकाशगंगा लाल दिसतात. ह्या चित्रात लाल आकाशगंगा शोधण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा विश्व आजपेक्षा फ़ारच लहान होते तेव्हा त्याचे तापमान आजपेक्षा जास्त होते. प्रकाशकिरणांच्यात इतकी ताकद होती की ते प्रोटोनच्या विळख्यात सापडलेल्या ईलेक्ट्रोनला लगेच त्याच्यापासून वेगळे करायचे. ह्या स्थितीला प्लाझ्मा म्हटले जाते. पण जसे जसे विश्व प्रसरण पावले तसे तसे ह्या प्रकाशकिरणांची ताकद कमी होऊ लागली व ईलेक्ट्रोन व प्रोटोन एकत्र येउन हायड्रोजनची निर्मिती होऊ लागली.प्लाझ्माचे रूपांतर हायड्रोजन मध्ये झाले. ही सुरूवात होती विश्वाच्या काळोखातील काळाची कारण तेव्हा ताऱ्यांची निर्मिती झाली नव्हती.
जिथे हायड्रोजनचे प्रमाण जास्त होते तेथे गुरूत्वाकर्षणाने खूप सारे हायड्रोजन गोळा होऊ लागले व जेव्हा हायड्रोजनच्या आदळआपटीमध्ये तापमान अणूप्रक्रिया सुरू होण्याएवढे झाले तेव्हा पहिले तारे जन्माला आले. विश्वातील काळोखा मध्ये पुन्हा प्रकाशकिरणांची निर्मिती होऊ लागली. ह्या चित्रामध्ये असे पहिले तारे असलेल्या आकशगंगा देखील दिसून येतात.
छायाचित्र हक्क: NASA, ESA