Thursday, August 31, 2006

हबलचे सर्वात दूरचे छायाचित्र


हबलने टिपलेले आपल्या विश्वाचे हे सर्वात दूरचे चित्र. एक लक्ष सेकंदांसाठी (२८ दिवस) हबलचा रोख एकाच दिशेला ठेऊन हे चित्र घेतले गेले आहे. जेव्हा हबल जास्त वेळ एकाच ठिकाणी पाहते व त्या दिशेने येणारे प्रकाशकण गोळा करते, तेव्हा कमी दिप्ती असलेल्या वस्तू हळूहळू तिने पाठविलेल्या छायाचित्रात दिसू लागतात.

हे चित्र आकाशातिल एका अशा जागेचे आहे जेथून साध्या डोळ्याने कोणतेच तारे दिसत नाही. त्यामुळे या चित्रात दिसणाऱ्या जवळपास सर्व गोष्टी आकाशगंगा आहेत. प्रकाशाचा वेग मर्यादित असल्याने, दूर च्या आकाशगंगांतून प्रकाश आपल्या पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागतो. यामुळे दूर पाहणे म्हणजे भूतकाळात पाहण्यासारखे आहे. साधे उदाहरण द्यायचे तर, सूर्य आपल्यापासून ५०० प्रकाशसेकंद दूर आहे. याचा अर्थ असा होतो की आपण जेव्हा सूर्य बघतो, तेव्हा तो ५०० सेकंदापूर्विचा असतो कारण जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यांमध्ये जातात ते सूर्याकडून ५०० सेकंदापूर्वी निघाले असतात.

त्यामुळे ह्या चित्रातील काही आकाशगंगा ह्या विश्वाच्या बालपणातिल आकाशगंगा आहेत. सर्वात लांब असलेल्या आकाशगंगा लाल दिसतात. जसेजसे आपले विश्व प्रसरण पावते तसे तसे प्रकाशाची तरंगलांबी वाढत जाते. त्यामुळे लांबच्या आकाशगंगा लाल दिसतात. ह्या चित्रात लाल आकाशगंगा शोधण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा विश्व आजपेक्षा फ़ारच लहान होते तेव्हा त्याचे तापमान आजपेक्षा जास्त होते. प्रकाशकिरणांच्यात इतकी ताकद होती की ते प्रोटोनच्या विळख्यात सापडलेल्या ईलेक्ट्रोनला लगेच त्याच्यापासून वेगळे करायचे. ह्या स्थितीला प्लाझ्मा म्हटले जाते. पण जसे जसे विश्व प्रसरण पावले तसे तसे ह्या प्रकाशकिरणांची ताकद कमी होऊ लागली व ईलेक्ट्रोन व प्रोटोन एकत्र येउन हायड्रोजनची निर्मिती होऊ लागली.प्लाझ्माचे रूपांतर हायड्रोजन मध्ये झाले. ही सुरूवात होती विश्वाच्या काळोखातील काळाची कारण तेव्हा ताऱ्यांची निर्मिती झाली नव्हती.

जिथे हायड्रोजनचे प्रमाण जास्त होते तेथे गुरूत्वाकर्षणाने खूप सारे हायड्रोजन गोळा होऊ लागले व जेव्हा हायड्रोजनच्या आदळआपटीमध्ये तापमान अणूप्रक्रिया सुरू होण्याएवढे झाले तेव्हा पहिले तारे जन्माला आले. विश्वातील काळोखा मध्ये पुन्हा प्रकाशकिरणांची निर्मिती होऊ लागली. ह्या चित्रामध्ये असे पहिले तारे असलेल्या आकशगंगा देखील दिसून येतात.

छायाचित्र हक्क: NASA, ESA

अटलांटीस पुन्हा उड्डाणस्थळावर

अरनेस्टो या वादळाचा धोका कमी झाल्याने अटलांटीसला पुन्हा उड्डाणस्थळी हलविण्यात आले आहे. पुढिल गुरुवारी म्हणजेच ७ सप्टेंबरला उड्डाण होऊ शकेल असे नासाकडून सांगण्यात आले आहे. जर हे उड्डाण काही कारणास्तव पुढे ढकलावे लागले तर अटलांटीस ऑक्टोबर मध्ये अवकाशात जाऊ शकेल.

अवकाशातिल धडक..


या अतिशय सुंदर छायाचित्रात काही आकाशगंगा दिसत आहेत. सर्वात ठळक उठून दिसते ती आहे NGC ३७१८. ही आकाशगंगा सर्पिलाकृती आहे व तिचा मध्यभाग वक्र आहे. तीचा मध्यभाग धुळीकणांच्या रांगांमागून चमकत आहे. उजव्या बाजूला असलेल्या आकाशगंगेच्या गुरुत्वाकर्षणबळामुळे तिचा विशिष्ट आकार तिला प्राप्त होतो असे समजले जाते. या दोन्ही आकाशगंगा आपल्यापासून ५२० लक्षप्रकाशवर्षे दूर आहेत. NGC ३७१८च्या खाली दिसत असलेला पाच आकाशगंगांचा कळप आपल्यापासून ४००० लक्ष प्रकाशवर्षे इतका दूर आहे.

आकाशगंगा गुरुत्वाकर्षणाने एकमेकांकडे आकर्षिल्या जातात व त्या एकत्र येतात. जरी आकाशगंगा एकमेकांना धडकल्या तरीही आतील तारे कधीच एकमेकांना धडकत नाहीत. अश्या सर्पिलाकृती आकाशगंगा जेव्हा एकमेकांना धडकतात तेव्हा त्यातील छोट्या आकाशगंगेचे तारे मोठ्या आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये मिसळतात. जर दोन्ही आकाशगंगांचे वस्तूमान सारखे असले तर, शेवटी दोन्ही आकाशगंगांचे सर्पिलाकृती रूप नष्ट होते व एक लंबवर्तुळाकृती आकाशगंगा तयार होते.

आपली आकाशगंगा सध्या आपल्या एका उपग्रह आकाशगंगेला गिळंकृत करत आहे. आपल्या सर्वात जवळची आकाशगंगा देवयानी आपल्या आकाशगंगे कडे हळूहळू सरकत आहे आणि काही सहस्त्र वर्षांनी आपल्या आकाशगंगेवर धडकेल...

छायाचित्र हक्कः: 2006 Astr. Campers, Adam Block (Caelum Obs.)
http://antwrp.gsfc.nasa.gov/apod/ap060831.html

Tuesday, August 29, 2006

अटलांटीसचे उड्डाण खराब वातावरणामुळे रद्द

नासाने अटलांटीसचे उड्डाण खराब वातावरणामुळे रद्द केले आहे. फ़्लोरीडा मध्ये एरनेस्टो या वादळाने वातावरण उड्डाणासाठी योग्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रशीयन सोयुझच्या उड्डाण कार्यक्रमावर याचा परिणाम होऊ शकतो.

अटलांटीसला त्याच्या उड्डाणस्थळापासून आज एका सुरक्षीत स्थानी हलविण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर पर्यंत हवामान अनुकूल झाल्यास अटलांटीसचे प्रक्षेपण होऊ शकते.

अटलांटीस आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या बांधकामाचे सामान अवकाशात नेणार आहे.

Saturday, August 26, 2006

प्लूटो आता एक खुजा ग्रह...

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र परिषद नुकतीच प्राग मध्ये संपन्न झाली... त्यातील एका ठरावानुसार सौरमालेतील ग्रहांसाठी एक नविन व्याख्येचा स्वीकार केला गेला. नविन व्याख्येनुसार ग्रह म्हणजे आपल्या सौरमालेतील सौरप्रदक्षिणा करणारी अशी वस्तू
१. जिचे वस्तूमान इतके आहे की ज्यामुळे ती गोल आकार धारण करू शकते.
२. जिने आपल्या कक्षेतिल अन्य वस्तूमान साफ़ केले आहे.

ज्या वस्तू पहिली अटीला पात्र ठरतात पण दुसऱ्या अटीमुळे ग्रह असू शकत नाहीत त्या वस्तूंना खुजा ग्रह म्हणून संबोधण्यात यावे.

प्लूटो यूरेनसच्या कक्षेला छेदत असल्यामुळे वरील व्याख्येनुसार, त्याला ग्रह म्हणणे चूक ठरते असे याआधी लिहिले होते, परंतु हे चूक आहे कारण प्लूटो उरेनसच्या कक्षेला छेदतो हा एक आभास आहे... प्लूटोच्या कक्षेत अजूनही काही लघुग्रह तत्सम गोष्टी आढळतात ज्यामुळे प्लूटो दुसऱ्या अटीस पात्र ठरत नाही. पण पहिली अट पूर्ण होत असल्याने प्लूटोला आता एक खुजा ग्रह म्हणून संबोधण्यात येईल.

या व्याख्येत काही त्रुटी जाणवतात कारण कक्षा साफ़ करणे म्हणजे नक्की काय ते पूर्णपणे उमजत नाही...

या निर्णयावरून इतका मोठा शोक करण्याचे काही कारण नाही. प्रसिद्धीमाध्यमांनी या गोष्टीचा खूप मोठा वाद बनविला आहे. प्लूटोला यामुळे काही एक होणार नाही. तो आहे तसाच त्याच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत राहिल. नासाचा प्लूटोवर यान पाठविण्याचा कार्यक्रम आहे तसा पार पडेल.

खगोलशास्त्राची ओळख...

ह्या संकेत स्थळावर मी आपणास खगोलशास्त्रातील नव्या घडामोडींबद्दल व खगोलशास्त्राबद्दल मराठीत माहीती देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या आठवड्यातून एकदा लिहण्याचा विचार मनात आहे...