
सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या वेळी एकत्र येऊन ग्रह बनू न शकलेले सूर्यमालेतील छोटे खडक म्हणजे थोडक्यात लघुग्रह. सूर्यमालेमध्ये साधारणपणे मंगळ व गुरू यांच्यामध्ये लघुग्रहांचा एक मोठा पट्टा आढळतो. आज सौरमालेतील ह्या लहानांची माहिती...
सर्व लघुग्रहांचे वस्तूमान एकत्र केले तर एकूण पृथ्वीच्या वस्तूमानाच्या केवळ .०५ टक्के एवढे भरेल. त्यातिल जवळजवळ एकतृतियांश वस्तूमान एकट्या सेरेस चे आहे. सेरेसला आता एक खुजाग्रह म्हटले जाते. सेरेसबरोबर व्हेस्टा, पॅलास आणि हायजिया हे मोठे लघुग्रह एकूण ५० टक्के वस्तूमान व्यापतात. एक किलोमीटर पेक्षा जास्त त्रिज्या असलेल्या लघुग्रहांची संख्या जवळजवळ २० लक्ष एवढी असेल.
हे सर्व लघुग्रह म्हणजे अवकाशामध्ये असलेला कचऱ्याप्रमाणे भासत असावेत. पण अवकाशाच्या पोकळीचा अंदाज यावा यासाठी पुढिल गणित मांडत आहे. २० लक्ष लघुग्रह जर २.५ खगोलशास्त्रिय एकक व २.८ खगोलशास्त्रिय एकक या जागेमध्ये समानतः विखुरले तर एका लघुग्रहासाठी किती जागा असेल?
लघुग्रहांच्या या पट्ट्याचे क्षेत्रफ़ळ जवळजवळ ५ खगोलशास्त्रिय एकक वर्ग एवढे आहे. एक खगोलशास्त्रिय एकक म्हणजे जवळजवळ ५०० प्रकाशसेकंद. या क्षेत्रफ़ळाला २० लक्षने भागले की उत्तर येते ०.६२५ प्रकाशसेकंद वर्ग. एक प्रकाशसेकंद म्हणजे ३ लाख किलोमीटर. ह्यावरून अवकाशाच्या पोकळीची कल्पना येते. थोडक्यात एखाद्या मोहिमेदरम्यान अवकाशयानाची कोणत्याही लघुग्रहाला धडकण्याची शक्यतादेखिल फ़ार कमी आहे.
सूर्याभोवती गोल फ़िरणाऱ्या प्रत्येक वस्तूची एक फ़ेरी पूर्ण करण्याची वेळ ही तिच्या जागेवरून निश्चित होते. जर एखादी वस्तू सूर्यापासून 'अ' खगोलशास्त्रिय एकक एवढी दूर असेल व एक फ़ेरी पूर्ण करायला लागणारा वेळेला 'ट' इतकी वर्ष लागत असतील तर, केपलरच्या नियमाप्रमाणे,
ट चा वर्ग = अ चा घन.
ह्याप्रकारे लघुग्रहांच्या गोल फ़िरण्याच्या वेळा त्यांच्या अंतरावरून काढता येतात. लघुग्रहांच्या ह्या पट्ट्यामध्ये काही पोकळ्या दिसून येतात. त्यांना कर्कवूडच्या पोकळ्या म्हणतात. ह्या पोकळ्यांचे असण्याचे एक विशेश कारण आहे. ह्या पोकळ्या अशा जागी आढळतात जेथून लघुग्रहाला सूर्याभोवती फ़िरायला लागणारी वेळ व गुरूला सूर्याभोवती फ़िरायला लागणारा वेळ यांचे गुणोत्तर २:१, ३:१, ५:२ अथवा ७:३ असे असते. ह्याचे कारण म्हणजे, जेव्हा जेव्हा गुरू ह्या लघुग्रहांच्या जवळ येतो तेव्हा तो त्यांना त्याच्याकडे आकर्षित करतो. पुन्हा एकदा सूर्याभोवती गुरू जाऊन आल्यावर त्याच ठिकाणी ह्या लघुग्रहाची पुन्हा भेट होते व गुरू त्याला पुन्हा थोडे खेचतो. काही फ़ेऱ्यांमध्येच लघुग्रहाची दिशा बदलून जाते व तो लघुग्रह एका नव्या कक्षेत जातो. कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगच्या सहाय्याने ही गोष्ट प्रत्यक्षरित्या पाहता ही येते. ज्यांना कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग येते त्यांनी ही गोष्ट अवश्य करून पहावी.
गुरूच्या कक्षेत असलेल्या काही लघुग्रहांबद्दल उद्याच्या लेखामध्ये माहिती घेऊ.
No comments:
Post a Comment