Saturday, September 30, 2006

ट्रॉयन्स, ग्रीक व गुरू

ट्रॉय व ग्रीस ह्या दोन महासत्तांमध्ये पुराणकाळात मोठे युद्ध झाले होते. ग्रीक सैनीकांना ट्रॉयची तटबंदी भेदण्यात अपयश आले. शेवटी एक पोकळी लाकडी घोडा बनविण्यात आला. ग्रीक सैन्य त्यामध्ये लपले आणि काही जहाजे परत ग्रीसला पाठविण्यात आली. ट्रॉयवासीयांना वाटले युद्ध संपले व ग्रीक पळून गेले आहेत. तो पोकळी घोडा ट्रॉय मध्ये आणण्यात आला. विजयोत्सव साजरा करण्यात आला. रात्री जेव्हा मद्यपान करून ट्रॉयवासी झोपी जात होते तेव्हा ग्रीक सैन्य त्या घोड्यातून बाहेर आले आणि ट्रॉयचा पराभव झाला.

तेथे ग्रीक जिंकले पण, अवकाशामध्ये हे युद्ध अजून चालू आहे. ग्रीक अजूनही ट्रॉयन्स चा पाठलाग करत आहेत पण यावेळी ग्रीकांना ट्रॉयन्स सापडू शकत नाहीत. भौतिकशास्त्राचे नियम ट्रॉयन्सच्या मदतीला आहेत. तुम्ही म्हणाल आज मला वेड लागले आहे व मी असंबद्ध बडबडत आहे.

गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये काही लघुग्रह आजही सापडतात. गुरूच्या कक्षेमध्ये गुरूच्या ६०° पुढे व ६०° मागे लघुग्रहांचे समूह सापडतात. गुरूच्या पुढे असलेल्या समूहाला ग्रीक समूह म्हणतात व मागे असलेल्या समूहास ट्रॉयन्स असे म्हणतात. गुरू सारखा मोठा ग्रह त्याच कक्षेत असला तरीही हे लघुग्रह त्याच कक्षेत काहीही न होता सूर्याभोवती फ़िरत राहतात. गुरू ह्या लघुग्रहांचे काही एक करू शकत नाही कारण त्या लघुग्रहांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ह्या स्थानांना लॅग्रांज स्थाने असे म्हणतात. भौतिकशास्त्रामध्ये तीन वस्तूमानांचा एकमेकांभोवती फ़िरण्याच्या प्रश्नाला 'Three body problem' असे म्हणतात. हा प्रश्न सहजासहजी सोडविता येत नाही. पण जर तीन वस्तूमानांपैकी एक फ़ार कमी असेल तर हा प्रश्न सोपा होतो व सोडविता येतो. आपल्या स्थितीमध्ये हे दोन मोठे वस्तूमान म्हणजे गुरू व सूर्य व कमी वस्तूमान असलेले लघुग्रह होय. गुरू सूर्याभोवती जवळजवळ वर्तुळाकृती कक्षेत फ़िरतो व ट्रॉयन्स व ग्रीक लघुग्रह ह्या दोन्ही वस्तूमानांनी तयार केलेल्या गुरुत्त्वाकर्षणाच्या जाळ्यामध्ये सूर्याभोवती जातात. हा प्रश्न सोडविला असता असे लक्षात येते की अशी पाच स्थाने आहेत जेथे गुरूचे बळ, सूर्याचे बळ आणि गोल फ़िरण्यामुळे जाणविणारे बळ ह्यांची बेरीज शून्य होते. ह्या स्थानांना लॅग्रांज स्थाने असे म्हणतात.


लॅग्रांज १, २ व ३ ही शून्यबल स्थाने गुरू व सूर्य ह्यांना जोडणाऱ्या सरळ रेषेत आढळतात तर लॅग्रांज ४ व ५ ही शून्यबल स्थाने सूर्य व गुरू ह्यांजबरोबर एक समभूज त्रिकोण तयार करतात. थोडक्यात, गुरूच्या कक्षेमध्ये गुरूच्या ६०° पुढे व ६०° मागे येथे ही स्थाने आहेत. लॅग्रांज १, २ व ३ ही स्थाने अस्थिर शून्यबल स्थाने आहेत. थोडक्यात जर एखादी वस्तू तेथे असली तर ती तेथे राहील हे खरे, पण जर तिला थोडासुद्धा धक्का लागला तर ती ह्या स्थानापासून दूर पळेल. पण लॅग्रांज ४ व ५ ही स्थिर शून्यबल स्थाने आहेत. व धक्का लागल्याने जर एखादी वस्तू थोडी दूर गेली तर ती पुन्हा त्या स्थानी येण्याचा प्रयत्न करते.

स्थिर शून्यबल स्थाने व अस्थिर शून्यबल स्थाने यांचे उदाहरण द्यायचे झाले तर, एका चेंडूचा विचार करू या. हा चेंडू जर तुम्ही एका टेकडीच्या माथ्यावर ठेवलात तर तो तेथेच राहील पण थोडासा जरी धक्का लागला तरी तो घरंगळत खाली जाईल. हाच चेंडू जर एका खड्ड्याच्या ठिकाणी ठेवला तर तो त्या ठिकाणी कितीही धक्का दिला तरी पुन्हा परत येईल. टेकडीचा माथा हे एक अस्थिर शून्यबल स्थान आहे तर खड्डा हे एक स्थिर शून्यबल स्थान आहे.

अशा प्रकारे ह्या लॅग्रांज ४ व ५ ह्या स्थिर स्थानांवर ट्रॉयन्स व ग्रीक लघुग्रह विसावले आहेत. ते तेथून हलू लागले की गुरुत्त्वाकर्षण त्यांना पुन्हा तेथे खेचून परत आणते. आणि वर्षोन् वर्षे ते तेथेच अडकलेले आहेत व गुरू बरोबर सूर्याला फ़ेऱ्या घालत आहेत.

Friday, September 29, 2006

लघुग्रह


सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या वेळी एकत्र येऊन ग्रह बनू न शकलेले सूर्यमालेतील छोटे खडक म्हणजे थोडक्यात लघुग्रह. सूर्यमालेमध्ये साधारणपणे मंगळ व गुरू यांच्यामध्ये लघुग्रहांचा एक मोठा पट्टा आढळतो. आज सौरमालेतील ह्या लहानांची माहिती...

सर्व लघुग्रहांचे वस्तूमान एकत्र केले तर एकूण पृथ्वीच्या वस्तूमानाच्या केवळ .०५ टक्के एवढे भरेल. त्यातिल जवळजवळ एकतृतियांश वस्तूमान एकट्या सेरेस चे आहे. सेरेसला आता एक खुजाग्रह म्हटले जाते. सेरेसबरोबर व्हेस्टा, पॅलास आणि हायजिया हे मोठे लघुग्रह एकूण ५० टक्के वस्तूमान व्यापतात. एक किलोमीटर पेक्षा जास्त त्रिज्या असलेल्या लघुग्रहांची संख्या जवळजवळ २० लक्ष एवढी असेल.

हे सर्व लघुग्रह म्हणजे अवकाशामध्ये असलेला कचऱ्याप्रमाणे भासत असावेत. पण अवकाशाच्या पोकळीचा अंदाज यावा यासाठी पुढिल गणित मांडत आहे. २० लक्ष लघुग्रह जर २.५ खगोलशास्त्रिय एकक व २.८ खगोलशास्त्रिय एकक या जागेमध्ये समानतः विखुरले तर एका लघुग्रहासाठी किती जागा असेल?

लघुग्रहांच्या या पट्ट्याचे क्षेत्रफ़ळ जवळजवळ ५ खगोलशास्त्रिय एकक वर्ग एवढे आहे. एक खगोलशास्त्रिय एकक म्हणजे जवळजवळ ५०० प्रकाशसेकंद. या क्षेत्रफ़ळाला २० लक्षने भागले की उत्तर येते ०.६२५ प्रकाशसेकंद वर्ग. एक प्रकाशसेकंद म्हणजे ३ लाख किलोमीटर. ह्यावरून अवकाशाच्या पोकळीची कल्पना येते. थोडक्यात एखाद्या मोहिमेदरम्यान अवकाशयानाची कोणत्याही लघुग्रहाला धडकण्याची शक्यतादेखिल फ़ार कमी आहे.

सूर्याभोवती गोल फ़िरणाऱ्या प्रत्येक वस्तूची एक फ़ेरी पूर्ण करण्याची वेळ ही तिच्या जागेवरून निश्चित होते. जर एखादी वस्तू सूर्यापासून 'अ' खगोलशास्त्रिय एकक एवढी दूर असेल व एक फ़ेरी पूर्ण करायला लागणारा वेळेला 'ट' इतकी वर्ष लागत असतील तर, केपलरच्या नियमाप्रमाणे,

ट चा वर्ग = अ चा घन.

ह्याप्रकारे लघुग्रहांच्या गोल फ़िरण्याच्या वेळा त्यांच्या अंतरावरून काढता येतात. लघुग्रहांच्या ह्या पट्ट्यामध्ये काही पोकळ्या दिसून येतात. त्यांना कर्कवूडच्या पोकळ्या म्हणतात. ह्या पोकळ्यांचे असण्याचे एक विशेश कारण आहे. ह्या पोकळ्या अशा जागी आढळतात जेथून लघुग्रहाला सूर्याभोवती फ़िरायला लागणारी वेळ व गुरूला सूर्याभोवती फ़िरायला लागणारा वेळ यांचे गुणोत्तर २:१, ३:१, ५:२ अथवा ७:३ असे असते. ह्याचे कारण म्हणजे, जेव्हा जेव्हा गुरू ह्या लघुग्रहांच्या जवळ येतो तेव्हा तो त्यांना त्याच्याकडे आकर्षित करतो. पुन्हा एकदा सूर्याभोवती गुरू जाऊन आल्यावर त्याच ठिकाणी ह्या लघुग्रहाची पुन्हा भेट होते व गुरू त्याला पुन्हा थोडे खेचतो. काही फ़ेऱ्यांमध्येच लघुग्रहाची दिशा बदलून जाते व तो लघुग्रह एका नव्या कक्षेत जातो. कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंगच्या सहाय्याने ही गोष्ट प्रत्यक्षरित्या पाहता ही येते. ज्यांना कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग येते त्यांनी ही गोष्ट अवश्य करून पहावी.

गुरूच्या कक्षेत असलेल्या काही लघुग्रहांबद्दल उद्याच्या लेखामध्ये माहिती घेऊ.

Tuesday, September 19, 2006

एक सूचना

लेखांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास कृपया निदर्शनास आणून देणे.

खगोलशास्त्रिय अंतरे. (सूर्यमाला)

आपल्या दैनंदिन जिवनामध्ये आपण कित्येकदा अंतरे मोजतो. उदाहरण द्यायचे झाले तर, केसांची लांबी, टेबलाची लांबी, घर ते ऑफ़िस पर्यंतचे अंतर, वगैरे वगैरे. ह्या लांबींची मोजणी करताना आपण नेहमी वेगवेगळी एकके वापरतो. केसांची लांबी मिलीमिटर वा सेंटीमीटर मध्ये, टेबलाची लांबी फ़ूट, तर घर ते कामापर्यंतचे अंतर किलोमीटर... खरंतरं ह्या साऱ्यांसाठी एकच एकक वापरले तरी चालण्यासारखे आहे. पण आपण नेहमी वेगवेगळी एकके वापरतो.

ह्याचे कारण बहुदा पुढिलप्रमाणे असावे. अंतर सांगताना खूप मोठ्या अथवा खूप लहान आकड्याचा वापर करावा लागू नये हा या वेगवेगळ्या एककांचा वापरामागील उद्देश्य असू शकतो. थोडक्यात ०.१ ते १०० ह्या आकड्यांची कल्पना करणे व त्यांच्यात तुलना करणे सोपे असते. त्यामुळे एकके निवडताना बऱ्याचदा अशी एकके वापरली की ज्यांच्या वापराने तुलना करणे सोपे जाईल. हा पूर्णतः माझा तर्क आहे व तो चुकीचा देखिल असू शकतो. आपल्या याबाबतच्या कल्पना जरूर कळवाव्यात.

आज आपण सूर्यमालेतील अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंतरांबद्दल विचार करू. सर्वात पहिल्यांदा विचार येतो तो सूर्य व इतर ग्रहांमधील अंतरांचा. आणि त्यासाठी सूर्य व पृथ्विमधील अंतराचा एकक म्हणून वापर करणे योग्य ठरते. या एककाला एक खगोलशास्त्रिय एकक असे म्हणतात. हे अंतर पार करण्यासाठी प्रकाशाला जवळपास ५०० सेकंद लागतात. हे अंतर १५ लक्ष किलोमीटर एवढे आहे. सूर्यमालेतील ग्रहांची सूर्यापासूनची अंतरे खगोलशास्त्रिय एककांमध्ये खालिल प्रमाणेः

बुधः ०.३९
शुक्रः ०.७२
पृथ्वीः १.००
मंगळः १.५२
गुरूः ५.२०
शनीः ९.५४
यूरेनसः १९.२२
नेपच्यूनः ३०.०६

खुजे ग्रहः
सीरीसः २.७६
प्लूटोः३९.४८
एरीसः ६७.६७

लघुग्रहः सरासरी २.५

पुढिल काही लेखांमध्ये हळूहळू खगोलशास्त्रामध्ये आढळणाऱ्या लांबलांबच्या गोष्टींची अंतरे कशी मोजतात ते पाहू.

छायाचित्र हक्क: नासा

Sunday, September 10, 2006

अटलांटीस अखेर अवकाशात

हा लेख लिहीत असताना अटलांटीसमधील अवकाशयात्री उड्डाणामुळे अटलांटीसला काही नुकसान झाले आहे का ते पाहत आहेत. कोलंबिया अपघातानंतर ही निरीक्षणे करणे अनिवार्य आहे. या अपघातामुळे अवकाशस्थानकाचे काम तब्बल दोन वर्षे बंद होते.

अटलांटीसचे उड्डान केप कॅनेव्हरल वरून तब्बल १८ तासांपूर्वी झाले. उड्डाण कार्यक्रम नियोजिल्याप्रमाणे पार पडला. अटलांटीसची तीनही इंजीने व्यवस्थित रित्या कार्य करीत होती. उड्डाणादरम्यान फ़ोम गळाल्याचे दिसून आले परंतु अटलांटीसला कोणतेही नुकसान झाल्याची चिन्हे प्राथमिक पाहणीत दिसून आली नाहीत. सध्या चालू असलेल्या पाहणीने ह्या गोष्टीची खात्री अवकाशयात्री करतील.

दरम्यान अवकाशस्थानकावर अटलांटीसला उतरवण्यासाठीची तयारी देखिल चालू आहे. अटलांटीसचे नाक अवकाशस्थानकाला एका विशिष्ट जागी जाऊन चिकटते. अटलांटीसचे अवकाशयात्री ३ वेळा आपल्या यानातून बाहेर येतील व स्थानकाचे बांधकाम करतील.

Tuesday, September 05, 2006

व्होयेजर-१ सूर्यापासून १०० खगोलशास्त्रीय एकक दूर

व्होयेजर १ व २ ही याने अशा पहिल्या मानवनिर्मित गोष्टी आहेत ज्या आपल्या सूर्यमालेबाहेर पोहोचल्या आहेत. त्यापैकी व्होयेजर १ हे यान १५ ऑगस्ट रोजी सूर्यापासून पृथ्वी या अंतराच्या १०० पट दूर पोहोचले आहे. सूर्यापासूनचे पृथ्वीच्या सरासरी अंतराला एक खगोलशास्त्रीय एकक म्हणतात. हे अंतर ५०० प्रकाशसेकंदे एवढे आहे.

व्होयेजर १ जिथे पोहोचले आहे त्या स्थानाहून सूर्य केवळ एक प्रकाश देणाय्रा छोट्या बिंदूप्रमाणे दिसतो. तेथून सूर्याची कोनीय त्रिज्या ही आपल्या दिसणाऱ्या कोनीय त्रिज्येच्या १०००० पट छोटी असेल. पुढिल निरिक्षणे सूर्याभोवताली असलेल्या अंतरतारीय माध्यमाबद्दल जास्त माहिती पुरवतील अशी आशा आहे.

दर दिवशी या यानाशी रेडिओलहरींद्वारे संपर्क साधला जातो. रेडिओलहरी प्रकाश असल्यामुळे यानापर्यंत पोहोचण्यास संदेशाला ५०००० सेकंद लागतात म्हणजे तब्बल १३.८८ तास. जसेजसे हे यान आपल्यापासून दूर होत जाईल तसेतसे हा काळ वाढत जाईल. ह्या यानांपासून येणाऱ्या संदेशांची शक्ती ही साधे घड्याळ वापरत असलेल्या शक्तीच्या जवळजवळ १ कोटीपट क्षीण आहे.
















व्होयेजर यानांनी गुरू, शनी, यूरेनस आणि नेपच्यून या ग्रहांची कित्येक सुंदर चित्रे आपल्याकडे पाठविली. गुरू ग्रहाला असणारी पातळ कडा, त्याच्या इतर उपग्रहांचा अभ्यास ह्या यानांमुळे शक्य झाला.

छायाचित्र हक्क: व्होयेजर टीम, नासा

Monday, September 04, 2006

यूरोपच्या पहिल्या चांद्रमोहिमेचा अंत

यूरोपचे पहिले चांद्रयान काल चंद्रावर आदळविण्यात आले. या मोहिमेची महत्त्वाची बाजू होती ह्या यानासाठी वापरण्यात आलेले इंजिन. आयनांचा वापर करून यानाला चंद्राकडे नेणे ही एक कठीण गोष्ट ह्या मोहिमेने करून दाखविली. या स्वस्त इंधनामुळे यूरोपियन स्पेस एजन्सीला नेहमी पेक्षा कमी खर्चात ही कामगिरी पार पाडता आली.

आयनांचा वापर करून फ़ार कमी त्वरण प्राप्त होते परंतु अवकाशात असलेल्या निर्वातामुळे हळूहळू यानाचा वेग वाढत जातो व एका जहाजाप्रमाणे अवकाशात तरंगत यान आपल्या निर्धारीत जागी पोहचवता येते. धडकेमुळे चंद्रावर जी धूळ उडाली तिचे विश्लेषण करण्याचा देखिल प्रयत्न केला गेला.

भारतीय चांद्रयान मोहिम २००७-०८ या मोहिमेत तयार करण्यात आलेली काही उपकरणे वापरेल.

दरम्यान नासाने मानवाला चंद्रावर पुन्हा नेण्यासाठी यान बनविण्यासाठीचा करार लॉकहीड मार्टिन या कंपनीबरोबर केला आहे. अपोलो यानांनतरची ही पहिली मानवाला चंद्रावर नेणारी मोहिम असेल.

अवकाशसंशोधन ही फ़ार खर्चिक गोष्ट आहे. या मोहिमांसाठी खर्च करण्याऐवजी पृथ्विवरिल प्रश्न सोडविणे जास्त महत्त्वाचे नाही का हा प्रश्न सहाजिकच मनात येतो. खरतर आज सर्व राष्ट्रांची सुरक्षेसाठी किती खर्च होतो याचा हिशोब केला तर त्या मानाने अवकाशसंशोधन कमी खर्चिक ठरते. थोडक्यात आपआपल्यात भांडण्या ऐवजी आपले ज्ञान वाढविण्यासाठी जर खर्च केला गेला तर ते जास्त उपयोगाचे ठरू शकेल.

Sunday, September 03, 2006

माझे घर...

संपूर्ण विश्वाच्या व्याप्तीमध्ये सूर्याभोवती तरंगत असलेले माझे घर. पाण्यामुळे निळसर रंग, आकाशात तरंगणारे ढग, मध्ये दर्शन देणारी भूमी... हे छायाचित्र अपोलो १७ मधील अवकाशयात्रींनी टिपलेले आहे... चंद्राकडे झेपावत असताना आपले टुमूकदार घर पाहताना कोणत्या कल्पना त्यांच्या मनात येत असतिल. अवकाशाची व्याप्ती पाहिल्यास ही एक फ़ारच छोटी जागा आहे.

संपूर्ण सूर्यमालेत असा एकमेव ग्रह जेथे सजीवसृष्टीचे अस्तित्व आहे. वातावरणातिल वायूंचा योग्य समतोल, सूर्यापासूनचे योग्य अंतर व त्यामुळे योग्य तापमान, ऑक्सीजन तयार करणारी झाडे आणि वापरून झाडांसाठी त्यांचा प्राणवायू (कार्बनडायोक्साईड) प्राणी यांच्यातिल एक अलिखित करार... हे सर्व येथे जिवनास कारणीभूत ठरते. सूर्याच्या दृष्टीने एक छोटा कण, पण आपल्यासाठी एक घर... विश्वात स्वर्ग कोठे आहे असे कोणी विचारले तर नक्कीच मी पृथ्वीकडे बोट दाखवेन...

पृथ्वीवर जिवन असणे हा निसर्गाचा एक नाजूक समतोल आहे. तो ढळू न देणे हे पृथ्विवरिल स्वतःला सर्वात बुद्धिमान सजीव म्हणवणाऱ्या मानवजातीचे कर्तव्य आहे. झाडांची लागवड व निगा, जंगलसंरक्षण व जतन हे आपले कर्तव्य आहे. आजचा विचार व स्वार्थ सोडून आपल्या पुढिल पिढ्यांचा जर विचार केला तर ही कामे सुरू करणे गरजेचे आहे. सर्वत्र राष्ट्रांनी जंगलनिर्मीतीचा संकल्प हाती घेणे गरजेचे आहे. गरीबांसाठी रोजगार निर्माण करून लोकसंख्येच्या विस्फ़ोटाला आळा घालणे गरजेचे आहे.

युद्धांबद्दल ऐकून मन विषण्ण होते. पृथ्वीवर जनजिवन तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागली. आणि ते आपण आपल्या स्वार्थासाठी, जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी उद्ध्वस्थ करायचे का? आयुष्य भरात पोहोचता येईल एवढ्या अवकाशामध्ये पृथ्वी सोडून एकही ग्रह वास्तव्यासाठी पोषक नाही. ह्या गोष्टीचे गांभिर्य आपण केव्हा लक्षात घेणार?

मला समजते की बोलणे जितके सोपे असते तेवढे करणे तितकेच कठिण, पण प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. प्रत्येक गोष्ट आपण एकट्याने केल्याने काय होणार असा विचार करत टाळली तर पृथ्वीवरून जिवन नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

छायाचित्र हक्क: Apollo 17 Crew, NASA

भारतीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड

भारतीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये आपल्या पाल्याला भाग घ्यावयाचा असल्यास अधिक माहिती करीता या संकेतस्थळावर क्लिक करा.

Saturday, September 02, 2006

ताऱ्यांचे आयुष्य

ताऱ्यांचा जन्म हायड्रोजनच्या ढगांमध्ये होतो. जेव्हा हायड्रोजनचे ढग आपल्या स्वतःच्या गुरूत्वाकर्षणाने कोसळू लागतात तेव्हा होणारी आदळआपटीने तापमान वाढत जाते व जेव्हा तापमान अणूप्रक्रियेला साजेसे होते तेव्हा तारे जन्माला येतात. आत अणूप्रक्रिया चालू झाल्याने गाभ्याच्या आत कोसळण्याला स्थगिती प्राप्त होते व अशा अवस्थेत तारे आपले सर्वाधिक आयुष्य घालवतात.

तारे आयुष्यभर हायड्रोजनचे रूपांतर हिलियम मध्ये करून ऊर्जा निर्माण करतात. पण हायड्रोजनचा साठा मर्यादित असल्यामुळे तो संपू लागला की ऊर्जानिर्मिती घटू लागते. आता ताऱ्याच्या बाहेरिल आवरणात हायड्रोजन असते व आतील गाभ्यात केवळ हिलियम उरते. आतला गाभा पुन्हा कोसळू लागतो. बाहेरिल आवरणातील हायड्रोजन जळू लागते व ताऱ्यांचे बाहेरील आवरण फ़ुगू लागते. जसा जसा फ़ुगवटा वाढतो तसातसा हायड्रोजनचे तापमान कमी होऊ लागते. तारा लाल व मोठा दिसू लागतो.

आतिल गाभा आत कोसळत असतो व त्यामुळे त्याचे तापमान वाढत असते. तापमान हिलियमच्या अणूप्रक्रियेस साजेसे झाले की आतिल गाभा हिलियमपासून कार्बन तयार करू लागतो. ह्या अणूप्रक्रियेच्या ऊर्जेमुळे गाभ्याच्या आत कोसळणे तात्पुरते थांबते. बाहेरील आवरण आत निर्माण होणाय्रा ऊर्जेमुळे अजून फ़ुगू लागते. अशा ताऱ्यांला लाल राक्षसी तारा म्हणतात.


शेवटी हिलियमदेखिल संपते व गाभा पुन्हा कोसळू लागतो. बाहेरिल थर बाहेर फ़ेकले जातात व त्यांचे सुंदर प्लानेटरी नेब्युला तयार होतात. आतील तापमान पुन्हा वाढू लागते व कार्बनचे रूपांतर ऑक्सिजन, नियॉन, मॅग्नेशियम, सिलिकॉन व शेवटी लोहात होते. यात निर्माण होणाय्रा प्रचंड ऊर्जेने एक प्रचंड विस्फ़ोट घडतो. बाहेरील थर व गाभ्यात तयार झालेले अणू बाहेर फ़ेकले जातात.

ह्या स्फ़ोटामुळे ज्या लहरी निर्माण होतात त्या ताय्राच्या भोवताली असलेल्या हायड्रोजनच्या ढगांचे कोसळणे सुरू करण्यास कारणीभूत ठरतात. थोडक्यात यामुळे नविन तारे जन्माला येतात. ताऱ्यांच्या स्फ़ोटांमध्ये बाहेर फ़ेकले गेलेल्या अणूंपासूनच आपले शरिर बनले आहे. आपण वापरत असलेले लोखंड व इतर सर्व गोष्टी ह्या खूप वर्षांपूर्वी एका ताऱ्याच्या अणूभट्टीत तयार झाल्या आहेत.

लोहाच्या अणूप्रक्रियेत ऊर्जानिर्मीती न होता ऊर्जेचा व्यय होतो आणि त्यामुळे ताय्राचा गाभ्याची घनता पुन्हा वाढू लागते. शेवटी जर ताऱ्याचे वजन एका मर्यादेपेक्षा कमी असले तर इलेक्ट्रॉनच्या अनाकर्षणामुळे ताऱ्याच्या गाभ्याचे कोसळणे थांबते. अशा ताऱ्याला पांढरा खुजा तारा म्हणतात.

एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वजन असल्यास न्यूट्रॉनचा दाब गाभ्याला कोसळण्यापासून थांबवतो. पण जे तारे आपल्या सूर्याच्या पाचपट वस्तूमान असलेले असतात, त्यांचा गाभ्याची घनता इतकी वाढते की प्रकाशदेखील त्यांच्या गुरूत्वाकर्षणातून सटकू शकत नाही आणि एक कृष्णविवर तयार होते.

छायाचित्र हक्कः नासा

एम ६६


चित्रात दिसणारी आकाशगंगा एम ६६ ह्या नावाने ओळखली जाते. ही एक सर्पिलाकृती आकाशगंगा आहे. ह्या आकाशगंगेमध्ये ठळकरित्या एक दंड दिसून येत आहे. तसेच तिच्या भुजांमधून येणारा प्रकाश मध्ये असलेल्या धुळीकणांमुळे अडला गेल्याचे ही दिसून येत आहे. भुजांमध्ये जी काळसर छटा दिसत आहे ती ह्या धुळीकणांच्या रांगांची साक्ष देत आहे. सर्वात वर दिसणारा ठळक तारा व चित्रात सर्वत्र विखुरलेले प्रकाशाचे छोटे स्त्रोत हे आपल्या आकाशगंगेमधले तारे आहेत जे आपल्या व एम ६६ च्या मध्ये आहेत.

१९९७ साली या आकाशगंगेमध्ये एका ताऱ्याचा विस्फ़ोट झाला.

छायाचित्र हक्कः M. Neeser (Univ.-Sternwarte Munchen), P. Barthel (Kapteyn Astron. Institute), H. Heyer, H. Boffin (ESO), ESO
http://antwrp.gsfc.nasa.gov/apod/ap060902.html